सिहोरा रेती घाटा वरुन घरकुल आवास योजना या नावाखाली वाळू उपसा सुरु
महसूल आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष ?
वंचित बहुजन आघाडी चे अधिकाऱ्यांकडे तक्रार
कन्हान : - कन्हान परिक्षेत्रातील सिहोरा रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून , महसूल आणि पोलिस प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे . वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष नितेश मेश्राम , शहर प्रवत्ता रजनिश मेश्राम , सचिव शैलेश ढोके यांनी तहसीलदार , जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री यांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली असून , त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे .
सिहोरा रेती घाटावर घरकुल आवास योजना या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे . महसूल विभागाचा रॉयल्टी अधिकारी घाटावर हजर नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळाले आहे . घाटावर प्रशासनाचा कोणताही प्रत्यक्ष नियंत्रण नसल्याने , सरकारी नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे .
प्रशासना कडून कधी ट्रॅक्टर पकडले गेले , तर तातडीने रॉयल्टी मागवून वाळू तस्करांना वाचवले जाते . त्यामुळे महसूल आणि पोलिस प्रशासन यांच्यामध्ये अवैध वाळू तस्करांना पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे . स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी दिल्या , मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही .
नियमानुसार कोल्हापुरी डॅमच्या 500 मीटर परिसरात उत्खनन करणे बंदी आहे , तरीही घाटावरून डॅमजवळ उत्खनन सुरूच आहे . शासनाने जाहीर केल्यानुसार वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर GPS आणि कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे , मात्र येथे कोणत्याही वाहनांवर ही साधने बसवलेली नाहीत . त्यामुळे नेमका किती प्रमाणात वाळू उपसा होत आहे , याचा ठावठिकाणा लागत नाही .
सिहोरा रेती घाटावरील अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करावी , अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष नितेश मेश्राम , शहर प्रवत्ता रजनिश मेश्राम , सचिव शैलेश ढोके यांनी तहसीलदारांना दिलेल्या लेखी तक्रारीत करण्यात आली आहे . या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी (SDM) , महसूल मंत्री , स्थानिक आमदार , खासदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आली आहे .
अवैध वाळू तस्करीमुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे . महसूल आणि पोलिस प्रशासन जर जाणूनबुजून दुर्लक्ष करत असेल , तर हा थेट शासनाच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग असल्याचे स्पष्ट होईल . वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर मोठे आंदोलन छेडले जाईल .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time